मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, मंगळवार (ता. ८) रोजी त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, सोमवारी मध्यरात्री आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करून सलाईन लावण्यात आले.
सोमवारी मध्यरात्री मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड तसेच नारायण गडाचे महंत यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधला. सरकार आपल्या मागण्यांवर चर्चा करीत असून लवकरच मार्ग निघेल, त्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू करावेत, अशी विनंती त्यांनी जरांगे यांना केली. त्यानंतर पहाटे अडीच वाजता जरांगे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.
यावेळी जालना येथील सिव्हिल सर्जन डॉ. राजेंद्र पाटील, वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड व आरोग्य विभागाचे पथक उपस्थित होते. तपासणीत जरांगे यांची शुगर ६६ वर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच उपोषणामुळे त्यांचे सुमारे सात किलो वजन घटले असून वजन ४५ किलो झाले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असल्याची माहिती डॉ. शुभम राठोड यांनी दिली.पहाटे अडीच वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत जरांगे यांना पाच सलाईन लावण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असून, १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीतून मुंबईकडे जाण्याची तारीख निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारकडून कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची गर्दी कायम असून, जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List