पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गणेश ठेंगडे यांच्यासमोरच घडला थरार; वन विभागाकडून पंचनामा
आधुनिक केसरी न्यूज
किशोर जाधव
खुलताबाद : पळसवाडी येथील दत्तात्रय गजानन ठेंगडे यांच्या एका शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला असून, परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दत्तात्रय ठेंगडे यांचे चिरंजीव गणेश ठेंगडे हे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला आणि तिला फरफटत घेऊन जाऊ लागला. हा प्रकार गणेशच्या निदर्शनास येताच त्याने बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने शेळीला सोडून तेथून पळ काढला.
यानंतर गणेशने जखमी शेळीला घरी आणले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळीने काही वेळातच प्राण सोडला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक पी. बी. काकरवाल व मयूर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याने शेळीच्या गळ्यावर हल्ला करून तिला जखमी केल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. वन विभागाच्या वतीने मृत शेळीचा पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्याला नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे पळसवाडीचे वनपाल रामनाथ जगधने यांनी सांगितले. दरम्यान, शाखापुरी परिसरात बिबट्याची वाढती दहशत पाहता शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी तसेच जनावरे चारण्यासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला पकडावे आणि ग्रामस्थांना या संकटातून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List