मनोज जरांगेंनी पाणी अन् सलाईन सोडले! आंदोलनाचा आज नववा दिवस
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
वडीगोद्री : अंतरवाली सराटी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा शनिवारी आठवा दिवस होता. सरकारने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. त्यांनी पाणी व वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला असून, डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासही असहमती दर्शवली.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर काही काळ जरांगे पाणी व सलाईन घेण्यास तयार झाले होते. मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत कोणतेही उपचार स्वीकारणार नसल्याचे सांगत त्यांनी ही संमती मागे घेतली.
‘सरकारने आमच्या सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याशिवाय मी काहीही घेणार नाही आणि कोणताही उपचारही करून घेणार नाही,’ अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली. यावेळी वैद्यकीय पथकाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार कायम ठेवला.
दरम्यान, नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याच्या दृष्टीने मराठा समाजाच्या सुमारे ५८ लाख नोंदींचे काम सुरू करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, या दिशेने अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भातील माहिती गावागावांत सार्वजनिक घोषणांद्वारे पोहोचवण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागण्यांबाबत एक-दोन दिवसांत निर्णय कळविण्याचे आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळाने दिले होते. मात्र, प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतल्याने अंतरवाली सराटीतील आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List