राजूर येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन:मराठा समाज आक्रमक,बाजारपेठ कडकडीत बंद
आधुनिक केसरी न्यूज
श्रीक्षेत्र राजूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राजुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.या आंदोलनात राजूरसह परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ चौकात एकत्र येऊन आंदोलनकर्त्यांनी मुख्य रस्त्याने पायी रॅली काढली होती. मराठा समाजाच्या वतीने व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे आंदोलनास पाठिंबा दिला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात रास्तारोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजातील अनेक मान्यवरांनी आपल्या भावणातून सरकार विरुद्धचा असंतोष व्यक्त केला.
एसटी बसला रस्ता मोकळा करून दिला
राजूर येथे रास्तारोको आंदोलन सुरू असताना याच वेळी राजूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसमधील एका रुग्णास शस्त्रक्रियेसाठी तातडीने नेण्यात येत होते.प्रवाशांनी ही बाब
आंदोलकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आंदोलकांनी कमालीची तत्परता दाखवत एसटी बसला वाट मोकळी करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
घोषणांनी परिसर दुमदुमला
आंदोलनादरम्यान मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी 'एक मराठा लाख मराठा' 'लढेंगे जितेंगे,हम सब जरांगे, 'तुमचं आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय' या घोषणांनी तेथील परिसर दुमदुमला होता.
मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा
सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमस्वरूपी मार्गी लावून जात पडताळणीत अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी.अन्यथा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
बंदची हाक देत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.राजूरमधील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला.काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.
हसनाबाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन आंदोलकावर लक्ष ठेवून होते.हसनाबाद पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List