समृद्धी महामार्गावरील सोनसाखळी लूट टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद
आधुनिक केसरी न्यूज
वैजापूर : समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक १८ जवळ वाहन अडवून चालकाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दिल्ली, नाशिक आणि बीड येथून पाच आरोपींना जेरबंद केले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची एक्सयूव्ही ७०० गाडीही ताब्यात घेतली आहे.
२६ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक १८, हडसपिंपळगावजवळ राहुरी, जि. अहिल्यानगर येथील एक व्यक्ती आपल्या वाहनातून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडवले. चालकाने वाहनाची काच खाली करताच आरोपींनी त्यांच्या कानशिलात मारून गळ्यातील अंदाजे एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन बळजबरीने काढून नेली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५९/२०२६, कलम ३१०(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. २९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी किरण अजिनाथ गायकवाड (वय २५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला रायमोहा येथून ताब्यात घेतले. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार परशुराम मोहन गायकवाड हा साथीदारासह दिल्लीला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. दिल्लीतील प्रसादनगर परिसरातून परशुराम मोहन गायकवाड आणि करण भरत जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. परशुराम गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, बीड, पुणे, बुलढाणा, धाराशिव, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांत २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच बीड जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, त्यात तो फरार होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनिल जयराम जाधव (रा. नाईकनगर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) याला नाशिक जिल्ह्यातील येवला येथून गुन्ह्यात वापरलेल्या एक्सयूव्ही ७०० वाहनासह ताब्यात घेतले. तर दुसऱ्या पथकाने पंडीत उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे याला बीड शहरातून ताब्यात घेतले. या कारवाईत परशुराम मोहन गायकवाड, करण भरत जाधव, किरण अजिनाथ गायकवाड, अनिल जयराम जाधव आणि पंडीत उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, वैजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच सायबर व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List