वरिष्ठ अधिकारी झोपेत, ग्रामसेवक गायब; वझरगा ग्रामपंचायतीत संतापाचा उद्रेक..!
आधुनिक केसरी न्यूज
माणिक सुर्यवंशी
देगलूर : वझरगा ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि गतिमान असावा, असा शासनाचा नियम असताना वझरगा येथे मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. येथील ग्रामसेवक फुलारी गेल्या १५ दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकले नसून, या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. "वरिष्ठ अधिकारी झोपेत आणि ग्रामसेवक गायब" अशी स्थिती निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक वेठीस
ग्रामसेवकाच्या १५ दिवसांच्या गैरहजेरीमुळे गावातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे.
विद्यार्थी व नागरिकांची परवड: शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होत आहे. योजनांचा बट्ट्याबोळ: संजय गांधी निराधार योजना, शेतकरी अनुदान आणि घरकुल योजनेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी नसल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष: ग्रामसेवक इतके दिवस गैरहजर राहूनही पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आंदोलनाचा इशारा "शासकीय पगार घेणारे कर्मचारी १५-१५ दिवस गावात येत नसतील आणि तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी झोपेतच राहणार असतील, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने जागे होऊन संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी; अन्यथा वझरगा ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढतील."
संतप्त ग्रामस्थ, वझरगा संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांनी चौकशी करावी आणि गावात पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा, अशी एकमुखी मागणी सध्या वझरगा ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List