स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम
आधुनिक केसरी न्यूज
माणिक सुर्यवंशी
देगलूर निपानी सावरगाव गावातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या मूलभूत मागणीसाठी निपाणी सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग सहावा दिवस आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरुद्ध संताप व्यक्त करत उपोषणकर्त्याने थेट लाकडांचे सरण रचून त्यावर ठिय्या मांडला आहे. सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मरणानंतरच्या हक्कासाठी जिवंतपणी सरणावर
गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती आणि महसूल विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उपोषणकर्त्याने स्वतःचे सरण रचून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. आंदोलनाच्या ठिकाणी भारतीय संविधानाची उद्देशिका, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा ठेवून लोकशाही मार्गाने हक्काची लढाई लढली जात आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांचा बंदोबस्त तैनात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नान्नत्यागामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चालली आहे. आंदोलनस्थळी गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहेत. वाढता तणाव लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून अधिकृत लेखी आदेश मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. उपोषणकर्त्याच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी वरिष्ठ प्रशासन जागे होऊन तत्काळ निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List