आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांनी आता एका मूक प्राण्यालाही जीवनदान दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) परिसरात १८ ऑगस्ट मंगळवार च्या रात्री ८ वाजताच्या सुमारास एक महाकाय अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे या अजगराचे प्राण सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीजवळ वाहन तळात अचानक एक मोठा अजगर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिसून आला. अजगराची लांबी आणि त्याचा भयानक आकार पाहून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजगराला इजा होण्याची किंवा अजगरामुळे मानवी जीवाला धोका निर्माण होण्याची भीती होती अशा आणीबाणीच्या परिस्थितीत घाबरून न जाता, सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ए .पी. सोनवाने, एस. एम .पारधी, सी. बी .घासले, वाहन चालक वासुदेवजी टेंभरे, स्वच्छता कर्मचारी तुलसीदास चौहान व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यंकटेश गजघाटे, हेमेंद्र बिसेन , भरत घासले या सदस्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. आणि अत्यंत काळजीपूर्वक व धैर्याने अजगराची हालचाल हाताळत त्याला व स्वतःला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुरक्षा साधनांचा वापर करून अत्यंत सुरक्षितपणे प्लास्टिकच्या बोरीत पकडले. या रेस्क्यू ऑपरेशननंतर अजगराला त्याच्या हक्काच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुरक्षितपणे मुक्त केले.आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ मानवी आरोग्याचीच नव्हे, तर वन्यजीवांच्या रक्षणाचीही जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने पार पाडल्यामुळे संपूर्ण गोरेगाव तालुक्यात सोनी PHC च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या धाडसाला परिसरातील नागरिकांनी सलाम केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List