गौलखेड गाव बिबट्याच्या दहशतीखाली; काळविटाची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
आधुनिक केसरी न्यूज
सागरकुमार झनके
जळगाव जा : तालुक्यातील गौलखेड गावालगत बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर बिबट्याने काळविटाची शिकार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौलखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले असून, शेतकरी व शेतमजुरांमध्येही चिंता वाढली आहे. यापूर्वीदेखील जळगाव जामोद तालुक्यातील विविध भागांत वन्यप्राण्यांकडून शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगल परिसरातील वन्यप्राणी आता अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर पडून मानवी वस्त्या तसेच शेतशिवारात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे.
बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटनाही तालुक्यात वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांकडे वाढता वावर हा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
वनविभागाने गौलखेड परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या वावराचा मागोवा घ्यावा तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शेतकरी व नागरिकांनीही शेतात जाताना विशेष सावधगिरी बाळगावी, रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ न जाता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे गौलखेड गाव सध्या भीतीच्या सावटाखाली असून, वनविभागाच्या ठोस उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List