तलवारीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी ५० हजारांचा दंड
आधुनिक केसरी न्यूज
सांगली : तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. व्ही. इंदापुरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, २ सप्टेंबर २०२२ ते २७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीने पीडितेला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पीडिता आणि तिची आई अंगणात झोपलेली असताना आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला उचलून नेले आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिच्या औषध-पाण्यात गर्भपाताच्या गोळ्या मिसळून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून विनायक देशपांडे यांनी काम पाहिले. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मुदरस्सर शेख, पोलीस अंमलदार एस. बी. यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, म.पो.ना. एस. एस. जाधव तसेच कोर्ट मॉनिटरिंग सेलच्या कर्मचाऱ्यांचे या प्रकरणात विशेष सहकार्य लाभले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List