जांभुळणीच्या डोंगरातील झाडीत अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड : माण तालुक्यातील जांभुळणी गावच्या हद्दीत भोजलिंग मंदिराच्या पाठीमागील डोंगर परिसरात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिला अंदाजे ३० ते ३५ वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळणी गावच्या हद्दीत भोजलिंग मंदिराच्या पाठीमागे नंदीच्या नाळव्याजवळील डोंगरातील वनराईच्या झाडीत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असून त्यावर अळ्या पडलेल्या अवस्थेत तो आढळला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.
याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस फौजदार एस. एच. वाघमारे हे या प्रकरणाचा तपास करीत असून, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी अनोळखी महिला बेपत्ता असल्याची माहिती असल्यास म्हसवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List