केक नाही; १६२ विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली..!
वाढदिवसाचा अनोखा आदर्श;विकास जाधव यांचा सामाजिक उपक्रम,गावातील अभ्यासिकेतून शैक्षणिक चळवळीला बळ
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : वाढदिवस म्हटला की केक,शुभेच्छा आणि जल्लोष... मात्र सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी या रूढ पद्धतीला फाटा देत आपला वाढदिवस विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणाऱ्या सामाजिक उपक्रमातून साजरा केला. बरजंळा लोखंडे,ता. भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल १६२ विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला.विद्यार्थ्यांनी नियमितपणे स्वच्छ व पुरेसे पाणी प्यावे,आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रत्येकाकडे स्वतःची पाण्याची बाटली असावी,या उद्देशाने हे वाटप करण्यात आले.बाटल्या मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
चौकट
गावातच अभ्यासाची ‘हक्काची जागा’
यावेळी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या आदर्श अभ्यासिकेचाही विशेष उल्लेख करण्यात आला.स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकरी आणि विविध शैक्षणिक परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना गावातच शांत व सकारात्मक वातावरण मिळावे,या उद्देशाने युवक आणि नागरिकांनी एकत्र येत अभ्यासिका उभारली आहे.शहरात जाऊन अभ्यास करण्याचा खर्च आणि प्रवासाची अडचण टाळून विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासाची सुविधा उपलब्ध झाल्याने ‘गावातील युवकच गावातील पुढच्या पिढीचे भविष्य घडवू शकतात’, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांचाही कायापालट शक्य..
यावेळी गोकुळ सपकाळ यांनी शाळेचे शैक्षणिक वातावरण, नैसर्गिक परिसर, रंगरंगोटी आणि उपलब्ध सुविधांचे कौतुक केले. गावकऱ्यांचा लोकसहभाग,युवकांची इच्छाशक्ती आणि शिक्षकांचे प्रयत्न एकत्र आले तर जिल्हा परिषद शाळांमध्येही दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शाळा आणि अभ्यासिका ही केवळ इमारती नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणारी केंद्रे आहेत. लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य,डिजिटल सुविधा आणि मार्गदर्शनपर उपक्रम वाढविल्यास ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवू शकतात, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास मुख्याध्यापक गजानन घायवट, शिक्षक सचिन वाघ, श्रीमंता बरडे, अविनाश किंगणे, संतोष दारुवाले, अनिल भुतेकर, तसेच बालाजी लोखंडे, नारायण लोखंडे, गजानन लोखंडे, संदिप भोकरे, साळूबा लोखंडे, अमोल खांडवे, प्रदीप लोखंडे, गोकुळ सपकाळ, आर्जून खांडवे यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List