भाकरीच्या शोधात घराबाहेर पडला; मृतदेह बनून घरी परतला..!

भाकरीच्या शोधात घराबाहेर पडला; मृतदेह बनून घरी परतला..!

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे

भोकरदन : दोन वेळच्या भाकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मजुराला कामाच्या ठिकाणीच मृत्यूने गाठले. भोकरदन येथील राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी स्लॅबचा भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेने बांधकामस्थळावरील सुरक्षा उपाययोजना,सेंटरिंगची मजबुती आणि कामाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (५०, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (३०, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (४०, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (३८, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (३०, रा. सुरंगळी) हे चार मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.इमारत उभी करण्याआधी सुरक्षा व्यवस्था का कोसळली?स्लॅब कोसळण्याची घटना नेमकी कशामुळे घडली?सेंटरिंगची तांत्रिक तपासणी झाली होती का?वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य दर्जेदार होते का? कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध होती का? काम सुरू असताना सक्षम अभियंता किंवा पर्यवेक्षक प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होता का? असे अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.हेल्मेट,सेफ्टी शूज, सुरक्षा पट्टे,संरक्षक जाळी यांसह आवश्यक सुरक्षा साधनांची व्यवस्था होती का?याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.बांधकामाचा वेग वाढविण्याच्या नादात सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले असेल,तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.

पंचनामा पुरेसा नाही; जबाबदारी निश्चित करा

दुर्घटनेनंतर केवळ पंचनामा करून प्रकरण कागदोपत्री बंद करण्याऐवजी बांधकामाची तांत्रिक तपासणी,सेंटरिंगची स्थिती,साहित्याची गुणवत्ता,कामाची मंजूर रचना,सुरक्षा मानके आणि देखरेखीची यंत्रणा यांची सखोल चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कंत्राटदाराने सुरक्षा नियमांचे पालन केले होते का?संबंधित अभियंत्याने कामाची पाहणी केली होती का? देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका काय होती? या सर्व बाबी तपासून ज्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदारी निष्पन्न होईल, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चार जखमींचा जीवही तितकाच मौल्यवान

दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या चार मजुरांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये.त्यांना आवश्यक ते उच्च दर्जाचे उपचार तातडीने मिळावेत आणि उपचाराचा खर्च शासन किंवा संबंधित यंत्रणेने उचलावा, अशी मागणी पुढे आली आहे.

एका घराचा आधार गेला; चार कुटुंबांवर संकट

मोतीलाल मिरगे रोजच्या मजुरीवर आपल्या कुटुंबाचा संसार चालवत होते. सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप परतण्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या मृत्यूने केवळ एका मजुराचा जीव गेला नाही, तर एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे.महाविद्यालयाची इमारत उद्या भक्कमपणे उभी राहील; मात्र तिच्या उभारणीच्या काळात एका मजुराचा जीव गेला आणि चार मजूर गंभीर जखमी झाले, तर या विकासाची किंमत कोणाच्या जीवावर मोजली जात आहे? हा प्रश्न भोकरदनकरांना अस्वस्थ करणारा आहे.

निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..!

या दुर्घटनेत कोणाचा दोष आहे,हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र तपासात सुरक्षा नियमांचे उल्लंघन,निष्काळजीपणा किंवा गंभीर हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदार,अभियंता किंवा जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी संतप्त मागणी होत आहे.मृत मजुराच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मिळावी,जखमी मजुरांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भाकरीच्या शोधात घराबाहेर पडला; मृतदेह बनून घरी परतला..! भाकरीच्या शोधात घराबाहेर पडला; मृतदेह बनून घरी परतला..!
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे भोकरदन : दोन वेळच्या भाकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मजुराला कामाच्या ठिकाणीच मृत्यूने गाठले. भोकरदन येथील राजकुंवर...
सांगलीत ‘पिस्तूल रॅकेट’चा पर्दाफाश! सेंधव्यातून आली पिस्तुलांची खेप
वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य!
एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ
अत्याचार, जबरी चोरी  प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराविरोधात युवक काँग्रेसचे वांद्रे आणि बोरीवलीत बॅनर फडकावून आंदोलन
वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश