अत्याचार, जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
आधुनिक केसरी न्यूज
सांगली : जत तालुक्यातील एका महिलेला बसस्थानकावर सोडण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून दागिने लुटणाऱ्या आरोपी मुनीर खुतबुद्दीन नदाफ (वय ५१, रा. जत) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला.
या खटल्याची अधिक माहिती अशी की, २६ सप्टेंबर २०१९ रोजी पीडित महिला जत तालुक्यातील एका गावातून जत येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होती. त्यावेळी आरोपीने आपल्या मोटारीतून तिला बसस्थानकावर सोडण्याचे सांगून विश्वास संपादन केला. मात्र, निगडी गावाच्या हद्दीतील पवनचक्कीकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिचे दागिने व मोबाईल हिसकावून आरोपी फरार झाला.
घटनेनंतर पीडित महिलेने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी एस. जी. मोहिते व दिलीप जगदाळे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्वला करवते यांनी काम पाहिले. न्यायालयात सरकार पक्षाने एकूण १८ साक्षीदार तपासले. पीडित महिला व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात सात वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापूरकर, महिला पोलिस कर्मचारी रेखा खोत, सुनिता आवळे, सुप्रिया भोसले आणि तुकाराम बंडगर यांनी सहकार्य केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List