जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा महाविद्यालय अजूनही सुरूच
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. ३० जुलै, २०२६ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून काल दिनांक 28 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार 29 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली असल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. कालपासून सुरू झालेल्या या पावसाने रात्री दमदार हजेरी लावली. आणि आज 30 जुलै रोजी पुन्हा सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे साडेआठ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कळविले होते. तसेच अनेक व्हाट्सअप ग्रुप वर सुद्धा हे मेसेज ताबडतोब व्हायरल झाले. परंतु असे असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील आणि विशेषतः शहरातील सुद्धा अनेक शाळा, महाविद्यालय अजूनही बातमी लिहीपर्यंत (12.30 पर्यंत) सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळा व महाविद्यालयांना या संदर्भातील अधिकृत पत्र प्राप्त न झाल्याने सुट्टी जाहीर करता येत नाही असे शाळा व महाविद्यालयाच्या व्यवस्थापना तर्फे सांगण्यात येत आहे. बरेचदा जिल्हाधिकारी सुद्धा अशा परिस्थितीत सुट्टीचे आदेश काढतात. परंतु अनेक खाजगी शाळा, महाविद्यालय मात्र या आदेशाचे पालन करताना दिसत नाही. बरेचदा विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केले जाते परंतु शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापकवृंद यांना मात्र सुट्टी दिली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये समजा एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता शाळा व महाविद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी करू लागले आहेत. मागील वर्षी सुद्धा तुकुम मधील एका शाळेमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच शहरातील एका मोठ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा थेट प्राचार्यांच्या केबिनमध्ये पाणी शिरले होते. अशावेळी अनपेक्षित पणे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? डिजिटल इंडियाच्या युगामध्ये समाज माध्यमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित महाविद्यालय आणि शाळेच्या च्या व्यवस्थापनांना अशा पद्धतीने त्वरित सुट्टीचे आदेश जाहीर करून संबंधित शाळा, महाविद्यालयाला सुट्टी देणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे.
अशा पद्धतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये आदेश देत असताना संबंधित शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांना थेट त्यांच्या ईमेलवर, व्हाट्सअप वर अथवा instagram वर डिजिटल पत्र त्वरित पोहोचविण्याची व्यवस्था करणे गरजेचे ठरते आहे. अन्यथा केवळ व्हाट्सअप ग्रुप वर आलेल्या साध्या मेसेजला शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य हे किंमतच देत नाही असे चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List