योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठक

योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : दि.१५ छत्रपती संभाजीनगर वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी याबाबत आयोजित बैठकीत दिले.

बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.
 
कंत्राटदाराने व संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनेची अर्धवट झालेली कामे कंत्राटदाराकरवी तातडीने पूर्ण करून घ्यावीत. पाण्याच्या टाकीची बांधकामे पूर्ण करण्यात यावीत. शहरातील वितरण प्रणालीचे कामही पूर्णत्वास न्यावे. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही. या योजनेच्या कामासाठी संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून सद्यस्थितीबाबत कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. शेवटच्या शहरवासीयाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी. शहरातील नळ जोडण्या देण्याचे प्रमाण वाढवावे. कंत्राटदाराच्या कामाचे मूल्यांकन करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा. संबंधित कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे 'हायड्रोलिक टेस्टिंग' पूर्ण करावे.

 कंत्राटदाराने योजनेचे विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. योजनेच्या कामाचे नियोजित टप्पेनिहाय आराखडा बनवून याबाबत पुढील बैठकीत सादरीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या  रेस्टोरेशनचे कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावे. रिस्टोरेशनचे कार्य गतीने पूर्ण करून खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 

बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केले. बैठकीस संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सहभाग घेतला.

थोडक्यात पाणीपुरवठा योजना ...
छत्रपती संभाजी नगर शहराच्या २०५२ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येला ६०४ एमएलडी (मिलियन लिटर पर डे) एवढा पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाणी वितरणासाठी शहरात ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार त्यापैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात १९११ किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी १२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ४६ हजार ५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि.१५ छत्रपती संभाजीनगर वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे....
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भुकंपाचे सौम्य धक्के 
भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..!