महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
भिगवण : दि.१० पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलेल्या भिगवण येथील २५ वर्षीय तरुणाचा संशयाच्या भरात मारहाण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारवाई करत चार जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुण अक्षय रमेश जाधव हा ८ जुलै रोजी मित्रांसमवेत महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेला होता. भोसे गावातील एका लॉजमध्ये मुक्काम केल्यानंतर रात्री तो अचानक बेपत्ता झाला. मित्रांनी परिसरात शोध घेत असताना हॉटेलपासून काही अंतरावर तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात, स्थानिकांच्या संशयातून अक्षयला अडवून लाकडी दांडे, काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला पाचगणी, वाई आणि त्यानंतर बारामती येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, ता. वाई) आणि अमोल गंगादेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
या घटनेमुळे भिगवण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संशयाच्या आधारावर झालेल्या या अमानुष मारहाणीबाबत संतापाची लाट उसळली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List