मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड : म्हसवड शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास विविध सामाजिक, राजकीय व नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणस्थळी कविताताई म्हैत्रे, तेजसिंह राजेमाने, संजय माने-पाटील, सचिन लोखंडे, रोहित सोनवणे, संभाजी लोखंडे, शांतीलाल सरतापे, भैय्या टाकणे, कांता ढाले, कासलिंग रुपनवर, मोतीलाल खंदारे, दीपक खंदारे, संतोष सोनवणे, बापू सदाफुले, प्रकाश लोखंडे, उत्तम होटकर व रंजीत लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणकर्ते किशोर सोनवणे यांनी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असून शासकीय निधीचा अपव्यय झाला असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध विकासकामांमध्ये त्रुटी असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या जलवाहिनी कामांची गुणवत्ता तपासून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सर्व आरोप फेटाळून लावत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. काही ठिकाणी जलवाहिन्यांची चाचणी (टेस्टिंग) सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अपूर्ण कामांवरून गैरसमज निर्माण केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून कोणालाही प्रत्यक्ष स्थळ पाहणी करता येईल, असेही मुख्याधिकारी डॉ. माने यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List