21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. 21ऑगस्ट 2026 रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा : कार्यक्रमाची सुरुवात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथून होणार असून सुमारे 3 किलोमीटरची ही वॉकेथॉन जुना वरोरा नाका - प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट - प्रियदर्शनी चौक आणि परत चांदा क्लब ग्राउंड येथे आल्यानंतर तेथे विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. महा वॉकेथॉनच्या माध्यमातून पाणी बचत, जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमातील सहभागींना टी-शर्ट, कॅप, बॅज तसेच ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
रील्स स्पर्धेचेही आयोजन : महा वॉकेथॉनच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागामार्फत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 21 ऑगस्ट 2026 असा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातूनही जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List