टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
अंबड ग्रामीण : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील भोकर वाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून सुरू असलेला वाद सोडविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर तरुणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २२) रात्री घडली. या प्रकरणी पाचोड व अंबड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत आठ संशयितांना रविवारी (ता. २३) ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर वाडी पथकर नाक्यावर शनिवारी रात्री काही तरुणांचा टोल कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून काहींनी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल पवन चव्हाण सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तरुणांचा सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त तरुणांनी चव्हाण यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे टोलनाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल पवन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे, दहशत पसरवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड व पाचोड पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून दिवसभर राबविलेल्या शोधमोहीमेत आठ संशयितांना ताब्यात घेतले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List