चारित्र्यावर संशय घेत, लोह्यात पतीचा पत्नीवर गोळीबार; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा..!
आधुनिक केसरी न्यूज
लोहा : शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात पत्नीवर कथितरित्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि शस्त्र अधिनियमातील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, कथित गावठी कट्टा आरोपीकडे आला कुठून? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
फिर्यादी अर्चना विशाल जाधव (वय १९, रा. शिक्षक कॉलनी, लोहा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी विशाल सुरेश जाधव (वय २२) याने चारित्र्यावर संशय घेत वाद घालत तिला थापडा, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील कथित गावठी कट्ट्यातून तिच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना दूरध्वनी करून, 'तुझ्या पोरीला गोळी घातली, आता तुझ्याकडे येतो,' अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या वैद्यकीय तपासणी (एमएलसी) अहवाल व जबाबाच्या आधारे लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चारित्र्याच्या संशयावरून घटना घडल्याचा आरोप
प्राथमिक माहितीनुसार आरोपी विशाल जाधव हा मूळ गांधीनगर येथील रहिवासी असून लोह्यातील एका मद्यविक्री दुकानात माल पुरवठ्याचे काम करतो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीसंदर्भातील काही गुन्हे नोंद असल्याची प्राथमिक माहिती असून त्याची अधिकृत पडताळणी सुरू आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीकडे कथित गावठी कट्टा आला कुठून ? तो कोणी पुरविला ? त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळावरील फॉरेन्सिक पुरावे, न्यायवैद्यकीय अहवाल आणि शस्त्राच्या तपासणीनंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नुरशाहद पठाण करीत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List