शहागडमध्ये मोकाट कुत्र्यांचा थरार; ११ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला

शहागडमध्ये मोकाट कुत्र्यांचा थरार; ११ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला

आधुनिक केसरी न्यूज 

त्रिसिंग जायभाये 

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, प्रशासनाच्या नाकाखाली एक भयंकर घटना घडली आहे. लक्ष्मी आई मंदिर, सराफा बाजार परिसरात एका ११ वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला चढवला. सोमवारी दि. १० रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहागड परिसरात भीतीचे सावट पसरले असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.

नागरिकांची धावपळ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहागड येथील रहिवासी मुक्तदीर कदीर बागवान यांचा ११ वर्षीय मुलगा आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्याने थेट चावा घेतल्याने मुलगा प्रचंड रक्तबंबाळ झाला. चिमुकल्याच्या आकांताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले.

नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीचे डोळे कधी उघडणार?

शहागड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. लहान मुले, महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरून चालताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. कुत्र्यांचे टोळके अचानक अंगावर धावून येत असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म हललेले नाही.

एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला पाझर फुटणार का? असा रोकडा आणि संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

बीड जिल्ह्यातून कुत्रे आणून सोडले जात असल्याचा खळबळजनक आरोप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शेजारच्या बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातून भटके आणि पिसाळलेले कुत्रे शहागडच्या हद्दीत आणून सोडले जात आहेत. यामुळेच गावात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकाराची प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

कागदी घोडे नाचवू नका, थेट कारवाई करा

आज एका चिमुकल्यावर हल्ला झाला, उद्या एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? केवळ तोंडी आश्वासने आणि कागदी कारवाईत वेळ न घालवता ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून या मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असा थेट इशारा शहागडच्या संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शहागडमध्ये मोकाट कुत्र्यांचा थरार; ११ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला शहागडमध्ये मोकाट कुत्र्यांचा थरार; ११ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला
आधुनिक केसरी न्यूज  त्रिसिंग जायभाये  शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, प्रशासनाच्या...
डोळ्यांना दृष्टी मातीत हिरवाई रस्त्यावर शिस्त अन् हातात बचतीची शिदोरी..!
धावड्यात जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण ताब्यात, चौघे फरार; ₹१.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चौथीत पाहिलं डॉक्टर होण्याचं स्वप्न... आज स्वतःचं रुग्णालय उभं केलं..
स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..!
अल्प मानधनावर पोषण आहार योजनेचा डिजिटल कारभार; कायम सेवेसाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स आक्रमक...
मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?