मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?

मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे 

भोकरदन : स्लॅब कोसळला एक मजूर ठार, चौघे गंभीर..या भीषण दुर्घटनेनंतर राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामाची सुरक्षितता तर सवालांच्या भोवऱ्यात सापडलीच;पण आता त्याहून गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.या बांधकामाला आवश्यक ती अधिकृत परवानगी होती तरी का भोकरदन शहरालगत सुरू असलेल्या राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला,तर चौघे जखमी झाले.या दुर्घटनेने बांधकामातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.मात्र दुर्घटनेनंतर आता बांधकामाच्या वैधतेची कागदपत्रे तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे.ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम;परवानगी कुठे आहे?

महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असलेला परिसर ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याची माहिती आहे.त्यामुळे एवढ्या मोठ्या बांधकामासाठी बांधकाम परवाना कोणी दिला.मंजूर बांधकाम नकाशा आहे का.. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक मंजुरी घेण्यात आली का..हे प्रश्न आता केवळ चर्चेचे राहिलेले नाहीत;तर प्रशासनाने कागदपत्रांसह उत्तर देण्याची वेळ आली आहे.बांधकामाला परवानगी दिली असेल तर त्याची प्रत सार्वजनिक करावी.मंजूर नकाशा कोणता त्यानुसारच बांधकाम झाले का बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती का स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते का आणि परवानगी नसेल तर एवढे मोठे बांधकाम सुरू असताना संबंधित यंत्रणा झोपली होती का

‘कागदावर’ परवानगी अन् प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली...

बांधकाम परवानगी म्हणजे केवळ एक कागद नव्हे.त्यामागे मंजूर आराखडा,बांधकामाचे नियम,संरचनात्मक सुरक्षितता, तांत्रिक तपासणी आणि संबंधित विभागांची जबाबदारी जोडलेली असते.मग राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामात या सर्व बाबींची पूर्तता झाली होती का स्लॅब कोसळण्यास नेमके कारण काय निकृष्ट साहित्य वापरले गेले का.. बांधकाम पद्धतीत त्रुटी होत्या का..स्ट्रक्चरल इंजिनिअरने पाहणी केली होती का..संबंधित अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळी भेट दिली होती का..या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीच्या अहवालातून नव्हे,तर कागदपत्रांतून समोर आली पाहिजेत.

दुर्घटना झाली नसती तर परवानगी तपासली असती का...हीच सर्वात मोठी खंत..

जोपर्यंत दुर्घटना होत नाही,तोपर्यंत बांधकामाच्या सुरक्षिततेकडे आणि परवानग्यांकडे दुर्लक्ष होते का एका मजुराचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला बांधकामाच्या कागदपत्रांची आठवण होणार असेल,तर ही यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह आहे.आज एक मजूर मृत्यूमुखी पडला. उद्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा वापर होणारी इमारत उभी राहणार आहे.त्यामुळे तिच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याची वैधता आणि सुरक्षितता तपासणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

‘महाविद्यालय’ म्हणून नियमांना सूट मिळणार नाही....

शैक्षणिक संस्था उभी राहत आहे,ही निश्चितच चांगली बाब.मात्र शिक्षणसंस्थेचे बांधकाम असो वा कोणतीही अन्य इमारत नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत.महाविद्यालयाच्या नावाखाली बांधकाम परवानगी,मंजूर नकाशा, स्ट्रक्चरल तपासणी किंवा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाले असेल,तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.इमारत किती मोठी आहे यापेक्षा ती किती सुरक्षित आणि कायदेशीर आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आता ग्रामपंचायतीने कागद उघडावेत...

या दुर्घटनेनंतर संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने स्पष्ट करावे बांधकाम परवाना दिला होता का..
मंजूर नकाशा कोणता आहे..
परवानगीची मुदत किती आहे..बांधकामाची पाहणी कोणी केली..स्ट्रक्चरल सुरक्षिततेचे प्रमाणपत्र आहे का..मंजूर आराखड्याप्रमाणेच प्रत्यक्ष बांधकाम झाले आहे का हे प्रश्न आता जनतेच्या मनात आहेत.

‘परवानगी’चा हिशेब जनतेसमोर ठेवा....

एका मजुराचा जीव गेल्यानंतर केवळ पंचनामा करून प्रकरण मिटवणे पुरेसे नाही. संपूर्ण बांधकामाची वैधता तपासली पाहिजे.बांधकाम परवाना,मंजूर नकाशा, स्ट्रक्चरल डिझाईन, तांत्रिक तपासणी,साहित्याची गुणवत्ता आणि सुरक्षा उपाययोजना यांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.जर सर्व परवानग्या नियमांनुसार असतील तर प्रशासनाने त्या जनतेसमोर ठेवाव्यात. आणि नियम मोडले असतील तर जबाबदार कोण, हेही स्पष्ट करावे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..! स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन  : एका थोर व्यक्तीच्या स्मृती केवळ छायाचित्राला हार घालून जपायच्या नसतात... त्या विचारांना कृतीची जोड देऊन...
अल्प मानधनावर पोषण आहार योजनेचा डिजिटल कारभार; कायम सेवेसाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स आक्रमक...
मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?
राष्ट्रध्वजाला विरोध करणाऱ्यांकडून ‘तिरंगा यात्रा’ काढली जात असेल तर स्वागतार्हच, ‘देर आये दुरुस्त आये’: हर्षवर्धन सपकाळ
लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू 
हाणेगाव आश्रमशाळेत चिकन भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; तहसीलदार आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव.
भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले