स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..!
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : एका थोर व्यक्तीच्या स्मृती केवळ छायाचित्राला हार घालून जपायच्या नसतात... त्या विचारांना कृतीची जोड देऊन पुढे न्यायच्या असतात.याच भावनेतून बाभुळगाव येथील नागेश्वर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयाचे भूतपूर्व संस्थापक अध्यक्ष शिवस्वरूप रामराव महाराज शेळके यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या स्मृतींच्या साक्षीने महाविद्यालयाच्या परिसरात विविध वृक्ष व औषधी वनस्पतींची लागवड करून ‘स्मृतींची सावली, हिरवाईच्या रूपाने’ जपण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात शिवस्वरूप रामराव महाराज शेळके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेला सुरुवात करण्यात आली.या वेळी प्रा. डी.आर. शेळके,प्रा. आर.ई.पाटील, व्ही.व्ही. मॅडम,केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी. वाघ, संकेत अंकुश पिसे, पार्थ रविंद्र पिसे, राजू मैंद, सचिन भालेकर, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
महाविद्यालयाच्या परिसरात औदुंबर, नीम, बेल, आंबा, जास्वंद, सीताफळ, हनुमान फळ, चिकू, बदाम, फायकस, गुलमोहर, कोनोकार्पस, बटनवुड, जांभूळ, जठरोफा, मोरपंखी, तुळस, मेहंदी, पारिजातक यांसह विविध शोभेच्या व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.मात्र हा उपक्रम केवळ फोटो काढून वृक्षारोपण करण्यापुरता मर्यादित न ठेवता लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
‘रोप लावणे सोपे; ते जगवणे ही खरी जबाबदारी
वृक्षप्रेमी प्रा.डी.आर. शेळके यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना केवळ वृक्षारोपणाचा संकल्प न करता, लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले.झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडे वाढवा.रोप लावून फोटो काढणे हा पर्यावरण संवर्धनाचा शेवट नाही; उलट तेथून खरी जबाबदारी सुरू होते. प्रत्येक रोप मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्याची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ढासळत चाललेला पर्यावरणीय समतोल पुन्हा साधण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List