धावड्यात जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण ताब्यात, चौघे फरार; ₹१.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : मंगल कार्यालयाच्या आवारातच जुगाराचा डाव रंगला पैशांची उलाढाल सुरू झाली... अन् पोलिसांनी अचानक धाड टाकत सगळा खेळच उधळून लावला. मौजे धावडा येथील कोळी समाज मंगल कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या जन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले,तर चौघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.या कारवाईत ₹६ हजार ४७० रोख रकमेसह तीन मोटारसायकली असा एकूण ₹१ लाख ९६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.धावडा येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांची धावपळ उडाली.मात्र पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले.
पाच जण पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांच्या कारवाईत उमेश एकनाथ गवळी, विशाल गणेश फुसे, मुकेश एकनाथ गवळी, सय्यद साबीर सय्यद जहुर आणि गणेश भगवान गवळी हे पाच जण मिळून आले.तर सोमीनाथ प्रभू गवळी,अमोल तेजराव गवळी, गणेश रमेश गवळी आणि विनोद सुपडा गवळी हे चौघे पोलिसांच्या कारवाईपूर्वी किंवा कारवाईदरम्यान पसार झाले.त्यांचा शोध सुरू आहे.
रोकड अन् तीन दुचाकी जप्त
छाप्यात पोलिसांनी ₹६ हजार ४७० रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या.जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹१ लाख ९६ हजार ४७० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने खळबळ
धावड्यात सार्वजनिक वापराच्या मंगल कार्यालयाच्या आवारातच जुगाराचा डाव सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले असून,फरार झालेल्या चौघांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.ही कारवाई सपोनी माने, पोउपनि नेमाने, सहाय्यक फौजदार जायभाये आणि पोलीस अंमलदार जाधव यांच्या पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जुगारविरोधी कारवाई सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List