चौथीत पाहिलं डॉक्टर होण्याचं स्वप्न... आज स्वतःचं रुग्णालय उभं केलं..
शेतकरी कुटुंबातील लेकीची जिद्दीला सलाम; डॉक्टर,प्राध्यापिका ते रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेश्मा लोखंडे यांचा संघर्षमय यशप्रवास
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : घरची परिस्थिती साधी... हातात साधनं मर्यादित... पण डोळ्यांत मोठं स्वप्न... वाशीम जिल्ह्यातील पळसखेड या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.रेश्मा लोखंडे यांनी जिद्द,शिक्षण आणि अथक परिश्रमाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.चौथीत असताना मामा डॉ. राम बाजड यांची एम.बी.बी.एस.साठी निवड झाली आणि छोट्याशा रेश्माच्या मनात ‘मलाही डॉक्टर व्हायचंय’ हे स्वप्न रुजलं. त्या स्वप्नाला परिस्थितीने कधीच हरवू दिलं नाही.धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०१८ मध्ये एम.बी.बी.एस., तर मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमधून २०२१ मध्ये पॅथॉलॉजी विषयात एम.डी. पदवी त्यांनी संपादन केली.
शेतकरी घरची लेक... आज भावी डॉक्टर घडवते..
२०२२ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची बदली बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. आज त्या डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा आणि प्राध्यापिका म्हणून भावी डॉक्टरांना घडविण्याचे काम एकाच वेळी करत आहेत.दरम्यान, पारध येथील डॉ. आशिष लोखंडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर दोघांनी वैद्यकीय सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. २०२४ मध्ये ‘लोखंडे हॉस्पिटल क्रिटिकल केअर अँड डायग्नोस्टिक सेंटर’ सुरू करून त्यांनी रुग्णसेवेचा नवा अध्याय सुरू केला.
स्वप्न स्वतःचं... पण वाटचाल हजारोंसाठी प्रेरणादायी...
प्राध्यापकाची जबाबदारी,रुग्णसेवा, स्वतःचे रुग्णालय आणि कुटुंबाची जबाबदारी या सगळ्यांचा समतोल साधत डॉ. रेश्मा लोखंडे आजही आपल्या मातीशी जोडलेल्या आहेत.पळसखेडच्या मातीत रुजलेलं चौथीतलं एक छोटंसं स्वप्न आज डॉक्टर, प्राध्यापिका आणि रुग्णालयाच्या संचालिकेच्या रूपाने फुललं आहे.परिस्थितीने स्वप्नं छोटी होत नाहीत... जिद्द कमी पडली तरच ती अपुरी राहतात, हे डॉ. रेश्मा लोखंडे यांनी सिद्ध करून दाखवलं
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List