अंतरवालीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जरांगे पाटील आक्रमक
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
अंतरवाली सराटी : (ता. अंबड) दि २८ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा अंतरवालीत आणण्यात आल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आगामी आंदोलनाबाबत भूमिका मांडली. “आमच्या मागण्या पूर्ण करून त्यावर निर्णय झाल्याशिवाय माघार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील काळात मुंबईकडे कूच करण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.
उद्या अंतरवालीत आंदोलन; मराठा समाजाला येण्याचे आवाहन
जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशातील मराठा बांधवांना अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन केले आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत किंवा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे; मात्र त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली नाही, अशा सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “आताच निघा आणि सकाळी अंतरवालीत पोहोचा,” असे आवाहन करत त्यांनी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
“फडणवीसांना मराठ्यांसोबत कुस्ती खेळायची काय?”
अंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा मागविल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट सवाल केला. “फडणवीसांना काय मराठ्यांसोबत कुस्ती खेळायची काय? पुन्हा रक्ताचा चिखल करायचा का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील लढ्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईत गेल्यास थेट ‘वर्षा’वर आंदोलन करण्याचा इशारा
आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर मुंबईला जाण्याची वेळ आली तर यावेळी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे न थांबता थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन बसून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईकडे मोठ्या संख्येने वाहने जाणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
सातारा आणि कोल्हापूर गॅझेट मंजूर करण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच हैदराबाद गॅझेट, सातारा आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेट लागू करण्याची मागणी यापूर्वीही जरांगे पाटील यांनी केली होती. यातील हैदराबाद गॅझेटला मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत सरकारने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
या दोन्ही गॅझेटच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण आग्रही असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील अनेक बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. काहींनी अर्ज केले आहेत, काहींचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तर काहींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विखे पाटील, शिंदे यांच्यावरही टीका
यावेळी जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्यावरही टीका केली. ते फडणवीसांची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाच्या लेकरांचे त्यांना काही देणेघेणे नसून कारखाना आणि साखर कारखान्याशी संबंधित बाबींकडेच त्यांचे लक्ष असल्याची टीका त्यांनी केली. तसेच शिंदे आणि विखे पाटील हे मराठा समाजाला धोका देत असल्याचाही आरोप जरांगे पाटील यांनी केला.
आरपारच्या लढाईची भूमिका
“अनेक आंदोलने करूनही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही,” असा आरोप करत आता आरपारची लढाई लढण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मागण्या पूर्ण करून त्यावर निर्णय झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी सरकारने आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List