वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
आधुनिक केसरी न्यूज
वर्धा दि. २९(जिमाका) : मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून घोषित करण्यात आले असून, शहरातील ग्रंथालयांसाठी ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठी भाषा विभागाचा आढावा व साहित्यिकांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रदीप दाते, प्रा. सरोजिनी देशमुख, रवींद्र शोभणे, माजी प्राचार्य पद्माकर बाविस्कर, डॉ. गजानन कोठेवार, सुलभा पाटील, संजीव लाभे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक उपस्थित होते.
वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने वर्ध्याला ‘पुस्तकांचे शहर’ म्हणून मिळालेली ओळख महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील विविध ग्रंथालयांना मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि वाचकांना त्याचा लाभ होणार आहे. वर्ध्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेला या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार असल्याचे मराठी भाषा डॉ.सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या कामकाजासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वर्ग-१ दर्जाच्या मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या शासकीय कामकाजासह संवर्धन आणि प्रसाराच्या उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी लंडनमध्येही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लंडनमधील ज्या ऐतिहासिक इमारतीत पहिले मराठी मंडळ सुरू झाले होते, ती इमारत महाराष्ट्र शासनाने लिलावात खरेदी केली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची सांस्कृतिक आणि साहित्यिक ओळख जपण्यासाठी कवितांचे गाव देखील करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील साहित्यिकांच्या दर्जेदार अप्रकाशित साहित्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही मराठी भाषा विभाग पुढाकार घेणार आहे. साहित्याची तपासणी करून दर्जेदार साहित्य विभागामार्फत प्रकाशित केले जाणार आहे. तसेच प्रकाशित झालेली पुस्तके शासनाकडून खरेदी करून ती राज्यातील विविध ग्रंथालयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे नवोदित तसेच ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मराठी भाषा मंत्री डॉ.सामंत म्हणाले.
*पालकमंत्र्यांच्या मागणीला मराठी भाषा मंत्र्यांचा प्रतिसाद*
जिल्ह्याला साहित्यिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यामध्ये पुस्तकाचे गाव ही संकल्पना आपण सुरू करत आहे. याच धर्तीवर पुस्तकांचे शहर करण्यात यावे याची सुरुवात वर्धेपासून करावी अशी मागणी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली. या मागणीला उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर म्हणून वर्धा शहराची निवड केली. यावेळी जिल्ह्यातील मराठी साहित्यिकांनी आपल्या समस्या मांडल्या यावर शासन सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच तोडगा काढेल, असे मराठी भाषा मंत्र्यांनी आश्वस्त केले.
000000
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List