वर्दी बोलली कर्तृत्व गाजले; पिआय पंकज जाधव यांना केंद्राचा ‘उत्कृष्ट सेवा’ सन्मान..!
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : खाकी वर्दी म्हणजे केवळ अधिकाराची ओळख नव्हे,तर प्रत्येक क्षणी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शपथ याच कर्तव्यनिष्ठेची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दखल घेत जालना जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले होते.स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर या सन्मानाचे वितरण करण्यात आले आणि जाधव यांच्या कर्तृत्वाला मानाची सलामी मिळाली.जालना जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवताना तसेच गुन्हेगारीविरोधातील कारवाई,तपास आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा बजावली.त्यांच्या कर्तव्यनिष्ठ,शिस्तबद्ध आणि परिणामकारक कार्याची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेली दखल ही जालना पोलिसांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.१५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या हस्ते पंकज जाधव यांना पदक प्रदान करण्यात आले.पदक स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे क्षण विशेष ठरले.कर्तव्य बजावताना परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो, कायद्याची अंमलबजावणी आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्याची केंद्रस्तरावर दखल घेतली जाणे ही निश्चितच मोठी उपलब्धी मानली जात आहे.जाधव यांच्या या सन्मानामुळे जालना पोलिस दलाची मान उंचावली असून, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे पदक माझ्यासाठी केवळ सन्मान नसून,कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची आणखी मोठी जबाबदारी आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन,सहकाऱ्यांची साथ आणि जनतेचा विश्वास यामुळेच ही कामगिरी शक्य झाली.भविष्यातही कायदा-सुव्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षेसाठी पूर्ण निष्ठेने काम करत राहू.
— पंकज जाधव, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, जालना
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List