डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
दोदडगाव येथे विद्युत ठिणग्यांमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान; पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे विद्युत डीपीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील उभ्या ऊस पिकाला आग लागून जवळपास चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी गोरखनाथ खुशालराव मुंढे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दोदडगाव परिसरातील गट क्रमांक २२६ मध्ये गोरखनाथ मुंढे यांच्या शेतात ऊसाचे पीक उभे होते. दरम्यान, शेतालगत असलेल्या विद्युत डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे ऊसाच्या शेताला आग लागली. ऊसाचे पीक सुकलेले असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पाहता पाहता जवळपास चार एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत मोठ्या क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला होता. या घटनेमुळे शेतकरी गोरखनाथ मुंढे यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ऊस पिकासाठी केलेला खर्च तसेच अपेक्षित उत्पन्न हातातून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित महसूल व कृषी विभागाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील विद्युत डीपी व वीजवाहिन्यांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्यात यावी. विद्युत यंत्रणेत बिघाड अथवा शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List