तोटंबा घाटात कमांडर जीपचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
किनवट : सहस्रकुंड धबधबा येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपला भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास किनवट तालुक्यातील तोटंबा गावाजवळील घाटा जवळ घडली. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील रहिवासी असलेले भाविक कमांडर जीपने सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना तोटंबा घाटाच्या खाली चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कमांडर जीप रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे तिघेही तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पारडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची नावे अद्याप पर्यंत कळू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच तोटंबा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून वाहनातील जखमींना बाहेर काढले. अपघातातील सात जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी तेलंगणा राज्यात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले होते. या घटनेमुळे तोटंबा परिसरासह तेलंगणातील पारडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List