गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण

गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण

आधुनिक केसरी न्यूज 

 चंद्रकांत पतरंगे

गडचिरोली : वर्षानुवर्षे जंगलात घालवलेले आयुष्य मागे सोडून कुटुंबाच्या मायेच्या सावलीत परतण्याची वेळ आली अन् निरोपाचा क्षण डोळ्यांच्या कडा ओलावून गेला. नक्षलवादी नेता भूपतीसोबत शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात दाखल झालेल्या छत्तीसगडमधील ५० माजी नक्षलवाद्यांना सोमवारी गडचिरोलीतून त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. एकेकाळी जंगलातील संघर्षमय जीवनाचा भाग असलेले हे सदस्य आता सामान्य जीवन जगण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीत सुरू झालेल्या पुनर्वसन प्रक्रियेतून त्यांना नव्या आयुष्याची संधी मिळाली. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना आणि गावाला पुन्हा भेटण्याचा हा टप्पा त्यांच्या दृष्टीने विशेष ठरला. कुणाला आई-वडिलांची ओढ, कुणाला मुलांची प्रतीक्षा स्वगृही परतण्याच्या क्षणी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या. दीर्घ काळ कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर आई-वडिलांना भेटण्याची आस, पत्नी-मुलांना पुन्हा जवळ घेण्याची इच्छा आणि आपल्या गावच्या मातीवर पाऊल ठेवण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

निरोप घेताना काही जण भावुक झाले. अनेक वर्षे जंगलात गेलेला काळ मागे टाकून आता कुटुंबासोबत नव्याने संसार उभा करण्याची संधी मिळणार असल्याची भावना त्यांच्या मनात होती.
भूपतीच्या आत्मसमर्पणाने बदलाला मिळाली चालना
माओवादी नेता भूपतीने आपल्या सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षलविरोधी लढ्याला महत्त्वाचे वळण मिळाले. भूपतीने हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतर आत्मसमर्पण आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली.
आत्मसमर्पण म्हणजे केवळ शस्त्र सोडणे नव्हे, तर त्यानंतरचे आयुष्य उभे करणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे पुनर्वसन, रोजगार, कुटुंबाशी पुनर्मिलन आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी या बाबींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 छत्तीसगडमध्येही आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसन योजनेंतर्गत मदत आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एसपी एम. रमेश यांचा संवाद गडचिरोलीतून रवाना होण्यापूर्वी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांशी संवाद साधला. आतापर्यंतचा भूतकाळ मागे ठेवून मिळालेल्या संधीचा सकारात्मक उपयोग करावा, कुटुंबासोबत नव्याने आयुष्य उभे करावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रियपणे सहभागी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला. या संवादानंतर निरोपाचा क्षण अधिकच भावुक झाला. ज्या गडचिरोलीत त्यांनी शस्त्र खाली ठेवून नव्या जीवनाचा निर्णय घेतला, त्याच गडचिरोलीतून आता ते आपल्या कुटुंबाकडे परतत होते.

‘घरवापसी’चा अर्थ केवळ परतीचा प्रवास नाही
या ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही रवानगी ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हालचाल नाही. ती हिंसाचाराच्या सावटातून सामान्य जीवनाकडे होणाऱ्या परिवर्तनाची सुरुवात आहे. जंगलातील बंदुकीची वाट सोडून कुटुंबाच्या मायेच्या वाटेवर निघालेल्या या ५० जणांसाठी गडचिरोली आता संघर्षाची नव्हे, तर नव्या आयुष्याची आठवण ठरणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण गडचिरोलीतून ५० माजी नक्षलवाद्यांची स्वगृही वाटचाल; निरोपाच्या क्षणी भावुक झाले क्षण
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रकांत पतरंगे गडचिरोली : वर्षानुवर्षे जंगलात घालवलेले आयुष्य मागे सोडून कुटुंबाच्या मायेच्या सावलीत परतण्याची वेळ आली अन्...
तोटंबा घाटात कमांडर जीपचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
वरिष्ठ अधिकारी झोपेत, ग्रामसेवक गायब; वझरगा ग्रामपंचायतीत संतापाचा उद्रेक..!
चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
वर्धा पोलीस मुख्यालयातील 'शस्त्र गोळीबार प्रशिक्षण' यशस्वी; अंमलदार संभाजी मुंढकर यांचा गौरव
टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत