‘जीआर काढा अन् माझ्याकडे या; त्यात काय चूक आहे ते आम्ही सांगू! सरकारला जरांगे पाटलांचे थेट आव्हान
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
अंबड : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून आंदोलनाची धग कायम असताना मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि. २) सायंकाळी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला थेट आव्हान दिले आहे. “सरकारने ५८ लाख नोंदींचा जीआर काढावा. आता तुम्ही जीआर काढा आणि माझ्याकडे या. त्यामध्ये काय चूक आहे, ते आम्ही सांगू,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “आमच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून हटणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
विखे पाटलांवर जोरदार टीका
सरकारच्या चर्चेच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. “विखे पाटील सर्वात चालबाज माणूस आहेत. शिष्टमंडळ दोन दिवसांपासून संभाजीनगर येथे आहे. उंटावरून शेळ्या राखण्याचा हा प्रकार आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
‘तब्येत खराब झाल्यानंतर चर्चेला येऊन काय उपयोग?’
आंदोलनादरम्यान आपली प्रकृती खालावल्याचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला. “माझी तब्येत खराब झाल्यानंतर चर्चेसाठी येऊन काय उपयोग?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेट, सातारा-कोल्हापूर संस्थानाचा जीआर आणि सारथीच्या योजना
मराठा समाजाच्या मागण्या मांडताना जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देणे, सातारा-कोल्हापूर संस्थानासंदर्भातील जीआर काढणे आणि सारथीच्या योजना सुरू करणे, या मागण्यांवरही सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच मराठा समाजासाठी स्वतंत्र ‘मराठा मंत्रालय’ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. “मराठा मंत्रालय का स्थापन करत नाही?” असा सवालही त्यांनी सरकारला केला.
‘जातीसाठी मरण आले तरी चालेल’
आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. “जातीसाठी मरण आले तरी चालेल; मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने सर्व मागण्यांबाबत स्पष्ट निर्णय घेऊन त्याचा जीआर काढावा आणि त्यानंतरच आपल्याशी चर्चा करावी, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List