प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला; जरांगेंनी सरकारला दिला दोन दिवसांचा वेळ
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारच्या वतीने आलेले आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला अखेर यश आले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या कालावधीत मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य करून तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना उपोषणाबाबत विनंती केली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी पिले तसेच सलाईन घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र, सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने तातडीने जीआर काढून प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे, तसेच रद्द करण्यात आलेली चार प्रमाणपत्रेही देण्यात यावीत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. कोल्हापूर गॅझेटचा जीआरही आत्ताच काढावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दोन दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य करून जीआर काढला नाही, तर पुन्हा पाणी सोडले जाईल. सध्या पाणी पित असून सलाईन घेण्याची तयारी आहे; मात्र उपोषण सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळातून केवळ प्रसाद लाड हेच अंतरवाली सराटीत आले होते. उद्या सकाळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड हे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या भेटीत सरकारकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List