सांगली-तासगाव-बारामती महामार्गावरील प्रश्न तातडीने सोडवा - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे मागणी
आधुनिक केसरी न्यूज
सांगली : सांगली-तासगाव-बारामती (SH-75) राज्य महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि वाहतुकीशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे केली आहे. त्यांनी डॉ. घोष यांची भेट घेऊन महामार्गावरील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
सांगली ते कुमठे फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावर अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सांगली ते कुमठे फाटा या संपूर्ण मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट्स बसविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सांगली-तासगाव मार्गावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्नही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला. पुलाची आवश्यक दुरुस्ती करून त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, तसेच पुलावर आणि परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
महामार्गावरील वाढती वाहतूक, नागरिकांची वर्दळ आणि रात्रीच्या वेळी निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता या कामांकडे केवळ विकासकामे म्हणून न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सांगली शहर आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या सूचना द्याव्यात. महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स, चिंतामणीनगर रेल्वे पुलाची दुरुस्ती आणि प्रकाशव्यवस्थेची कामे विलंब न करता पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रश्नांवर प्रशासनाकडून लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List