ओबीसी आंदोलकांचे उपोषण पोलिसांनी रोखले; वडीगोद्रीत तणाव
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री परिसरात ओबीसी आंदोलकांकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सोमवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परवानगी नसताना आंदोलकांनी लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलकांनी ‘फडणवीस सरकार हाय हाय’, ‘सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिसांना पुढे करते’ अशा घोषणा देत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. दरम्यान, ॲड. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, बाबासाहेब बटुळे आणि सतीश कुलाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली
पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता तसेच विनापरवाना लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी आंदोलकांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी भूमिका कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
‘जरांगेंचे आंदोलन सरकारनेच बसवले’
यावेळी ॲड. मंगेश ससाणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ‘फडणवीस सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सरकारनेच बसवल्याचा आरोप केला.
‘सरकार लाचार आहे. जरांगे हे सरकारने बसवलेले आहेत,’ असा आरोप ससाणे यांनी केला. तसेच ‘ओबीसींची काय लायकी आहे, हे सरकार दाखवत आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, ओबीसी आंदोलकांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्याने आणि त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याने आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List