माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी
आधुनिक केसरी न्यूज
बालाजी वैजळे
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उडी घेतली असून हिमायतनगर तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी उपस्थित असल्याने ते भाजपाच्या कळपात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यांच्या सेवा सहकारी सोसायटीच्या काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या सोसायटीला नियमानुसार बाद ठरविण्यात आले होते. त्या विरोधात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी न्यायालयात धाव घेऊन निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायालयाचा निकाल हा माजी आमदार जवळगावकर यांच्या बाजूने लागला. दुपारी शेवटच्या टप्प्यात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आपल्या समर्थकांसह नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात दाखल झाले. त्यांनी हिमायतनगर तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महापालिकेतील भाजपाचे सभागृहनेते महेश कनकदंडे व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू गोविंदराव पाटील नागेलीकर हे उपस्थित होते. त्यामुळे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे महायुतीच्या कळपात सहभागी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच ते आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन भाजपा प्रवेशाची चाचपणी केली होती. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ते भाजपाच्या कळपात सहभागी झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे गोविंदराव पाटील नागेलीकर, सभागृह नेते महेश कनकदंडे, नगराध्यक्ष रफिक शेख, परमेश्वर गोपतवाड उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List