वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आधुनिक केसरी न्यूज
त्रिसिंग जायभाये
वडीगोद्री (ता. अंबड) : अंबड तालुक्यातील वडीगोद्री, धाकलगाव आणि पिठोरी शिवार परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, गेल्या ३ दिवसांत झालेल्या दोन हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री पिठोरी शिवारातील शेतकरी कैलास खरातडे यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री वडीगोद्री येथील मनीषा वायसे यांच्या शेतात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्या आता मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वन विभागाने तातडीने या परिसराचे सर्वेक्षण करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, रात्रीची गस्त वाढवावी तसेच पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List