सुपा टोलनाका म्हणजे जनतेसह शासनाचीही लूट !
चेतक कंपनीच्या अनियमित टोलवसुलीवर आमदार काशिनाथ दातेंचा विधानसभेत घणाघात !
आधुनिक केसरी न्यूज
श्रीनिवास शिंदे
पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेस कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली अनियमित टोलवसुली ही जनतेची आणि शासनाची लूट आहे, असा गंभीर आरोप पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केला. औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी टोल व्यवस्थापनातील अपहार, नियमभंग आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दुर्लक्षाबाबत सविस्तर माहिती सादर करत सरकारचे लक्ष वेधले.
आमदार दाते म्हणाले, "१३२ कोटींच्या कामासाठी ७०० कोटींची टोलवसुली ही सरळ लूट आहे. शासनाने याची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी." चेतक कंपनीने शासकीय नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांनी निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आल्याचे नमूद केले. रस्त्यांवरील अपघातांचे वाढते प्रमाण, ॲम्ब्युलन्स, क्रेन, मदत यंत्रणेचा अभाव, ४० मिमी जाडीच्या आवरणाची कमतरता आणि वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष यासारख्या गंभीर त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले.
"चेतक कंपनीला शासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाठबळ दिले असून, त्यांची भूमिकाही संशयास्पद आहे," असे सांगत आमदार दातेंनी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे सुपा टोलनाक्याच्या अनियमिततेवर काय कारवाई होते, याकडे पारनेर-नगर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
चेतक इंटरप्रायजेसच्या टोलवसुलीतील गैरव्यवहार आणि शासकीय अधिकाऱ्यांचे संशयास्पद वर्तन यामुळे जनतेच्या पैशांची लूट आणि जीव धोक्यात येत आहे. आमदार दातेंच्या मागणीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List