ब्रह्मपुरी तालुक्यात 10 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. 09 जुलै भारतीय हवामान खात्याने 7 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी “ऑरेंज अलर्ट” जारी केला असून पुढील काही दिवस अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, गोसीखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून प्राप्त सतर्कतेनुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीपात्रामध्ये पूरनियंत्रणासाठी 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून, ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना दिनांक 10 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी सी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2)(5) व (18) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेतला आहे.सदर आदेश फक्त ब्रह्मपुरी तालुक्यात लागू राहील. जिल्ह्यातील अन्य तहसीलांतील शाळा व शिक्षणसंस्थांना याचा लाभ होणार नाही. मात्र, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पार पाडावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List