गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक मार्ग वाहतुकीसाठी झाले बंद ; राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली..!
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : जिल्ह्याला आज 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असतानाच सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 110.6 मिमी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट परिसरात दरड कोसळल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या रेड अलर्टच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने चांगलीच मुलूंडी मारली. विशेष म्हणजे, संततधार पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली असतानाच काही धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक नाल्यांना पुर आल्याने जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 10, देवरी 10, तर गोंदिया तालुक्यातील एक मार्ग बंद झालेला आहे. त्यातच मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्गावरील देवरी ते कोहमारादरम्यानच्या मासुलकसा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी वाहतूक प्रभावित झाली असून एकेरी वाहतूक देण्यात आली आहे. दरम्यान, नदी नाल्यांच्या पाणी पात्रात सतत वाढ होत आहे. तेव्हा जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांना सुट्टी जाहीर : जिल्ह्यात रात्री पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक सखोल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नदी काठावरील गावांना इशारा : सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे द्वार दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास उघडण्यात येणार आहेत. तर मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर धरणाचे 2 गेट 1 मीटर ने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List