शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज
संतोष पाटील
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाह्य तपास यंत्रणांची नियुक्ती करण्याचे निर्देशही दिले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.सदस्य विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित मांडली होती. यावेळी सदस्य सुरेश धस यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसुल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत 2447 बनावट कर्मचारी दाखवण्यात आले. त्यांच्या नावाने पगाराचे पैसे काही अन्य व्यक्तींच्या खात्यांत वळते करण्यात आले. रुग्णालय विभागात 327 कर्मचारी दाखवले गेले, प्रत्यक्षात केवळ 13 कर्मचारी उपस्थित होते. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी, 109 खोल्यांच्या भक्तनिवासासाठी 200 कर्मचारी, 13 वाहनांसाठी 176 कर्मचारी, प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवण्यात आले होते. इतर विभागांमध्येही असेच बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. देवस्थानच्या देणगी व तेल विक्री काउंटर, पार्किंगसाठी कर्मचारी, गोशाळा, शेती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत आणि सुरक्षा विभागातही बोगस कर्मचाऱ्यांची माहिती आढळली. बनावट अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सायबर पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू आहे. जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List