श्रीवर्धन एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
एक्सलचे नट निखळलेले असताना सुद्धा केला मुंबई ते श्रीवर्धन प्रवास
आधुनिक केसरी न्यूज
मकरंद जाधव
श्रीवर्धन : आगाराला लागलेले नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण काही संपता संपत नाही. दि.२८ जून रोजी मुंबई सेंट्रल येथून प्रवाशांना घेऊन सकाळी सहा वाजता सुटलेली गाडी क्र.एम एच- १३ सी यू ६८९६ मुंबई- नानवली-श्रीवर्धन या गाडीच्या मागील दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे उजव्या बाजूच्या चाकाचे आठ पैकी पाच नट निखळलेले होते व उर्वरित तीन नट ढीले असतानासुद्धा या गाडीने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन पर्यंत प्रवास केल्याने श्रीवर्धन आगाराकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोर्ली पंचतन येथील बस स्थानकात ही गाडी आली असता धवल तवसाळकर यांनी हि गंभीर बाब बोर्ली पंचतन स्थानकाचे प्रमुख प्रसाद मोरे यांच्या लक्षात आणून देताच या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बस मधून पुढे पाठवण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील या गाडीच्या प्रवासात महामार्गावर अथवा म्हसळा तालुक्यातील घोणसे या अवघड घाटात गाडीचे चाक निखळून अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात असून या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास खाजगी बस सेवेच्या तुलनेने स्वस्त, सुरक्षित म्हणून ओळखला जातो विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सवलतींमुळे गोरगरिब आणि मध्यमवर्गीय जनतेला एसटी महामंडळाच्या बसशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु श्रीवर्धन आगारातील बसचा प्रवास गेले दिड दोन वर्ष धोकादायक वाटू लागला आहे.
महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात पण मागील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या एसटी गाड्यांची दुरावस्था पाहात त्याबद्दल प्रवासी नाराजी देखील व्यक्त करत आहेत. आगारमध्ये काही प्रमाणात नवीन गाड्या दाखल होत आहेत त्याचबरोबर प्रवाशांसाठी नवीन योजना देखील दिल्या जात आहेत.पण हे करीत असताना नादुरुस्त गाड्यांची जेमतेम केलेली दुरुस्ती आणि गाडी मार्गस्थ होण्यापूर्वी तीच्या तांत्रिक बाबींकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन धावणाऱ्या गाड्यांचा प्रवास किती सुरक्षित आहे? याकडे देखील जातीने लक्ष देणं गरजेचं आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List