अभयारण्य व्यवस्थापनात लोणार देशात दहावे..!
भारतीय वन्यजीव संस्थान व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल
आधुनिक केसरी न्यूज
प्रणव वराडे
लोणार : बेसॉल्ट खडकापासून निर्मित एकमेव सरोवर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणारने अभयारण्य व्यवस्थापनात देशात दहावे स्थान पटकावले आहे.जगप्रसिद्ध सरोवराच्या परिसरात असलेले अभयारण्य सन् २००० मध्ये लोणार सरोवर अभयारण्य म्हणून घोषित झाले. लोणार सरोवर अभयारण्य हे ३६५ हेक्टर जागेतील बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य आहे. मात्र, या अभयारण्यामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यंत्रणेने देशभरातील वन्यजीव अभयारण्यांचा नुकताच आढावा घेतला. यामध्ये रामसर हा जागतिक कीर्तीचा दर्जा प्राप्त असलेल्या लोणार अभयारण्याचाही समावेश होता. जंगलांच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये लोणार | अभयारण्याचा देशात दहावा क्रमांक लागला आहे.
महाराष्ट्रातील उमरेड कराडला राज्यात पहिले, तर राज्यात सातवे स्थान मिळाले आहे.
देशभरातील ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याचे मूल्यमापन करण्यात आले. विविध जंगलांची व्यवस्थापन कशा प्रकारे केली जाते, याबाबत अभ्यास गत पाच वर्षांमध्ये करण्यात आला. यामध्ये उत्तम स्थिती ही ८४ ठिकाणी आढळून आली, तर 'वाईट'चा शेराही १८ अभयारण्यांच्या वाट्याला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोणार हा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी शासकीय पातळीवर आराखडा घोषित झाला आहे. मात्र, हा आराखडा कागदावरच राहिला आहे.
जगभरातून पर्यटकांना बुलडाणा जिल्ह्यात खेचून आणण्याची क्षमता असलेल्या या लोणार आणि येथील वनसंपदेला अनुषंगाने पर्यटन विस्ताराच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. हे कधी होईल, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. असे असले तरी देशभरातील अभयारण्य उत्तम व्यवस्थापनात लोणारचा दहावा क्रमांक लागला ही बाब सुखद ठरली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List