धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!
धानोरकरांच्या मनपा गटनेता पदाला हायकोर्टाचा ब्रेक
आधुनिक केसरी न्यूज
श्याम हेडाऊ
चंद्रपूर : चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून धानोरकर वडेट्टीवार गटांची आपसात सुरू असलेली अंतर्गत कलहाची बाब आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली असून हायकोर्टाने वडेट्टीवार यांच्या गटाचे राजेश अडुर यांना दिलासा देत धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांना गटनेता पदाकडे जाण्यासाठी ब्रेक लावलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मनपा गटनेता प्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मात्र चांगला जोरदार धक्का बसला आहे.
हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचा बाउन्सर हायकोर्टामार्फत परस्पर टोलविला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी काँग्रेसचे गटनेते म्हणून सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मा. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या त्या आदेशाला स्थगिती दिली असून, पुढील सुनावणी ६ जुलै २०२६ रोजी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजेश अड्डूर हेच सध्या काँग्रेसचे अधिकृत गटनेते पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी एक आदेश जारी करून चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कार्यरत असलेले राजेश मुरली अडूर यांचे नाव रद्द केले होते. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद केली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध राजेश अड्डूर यांनी एडव्होकेट ए. एम. घारे यांच्यामार्फत हायकोर्टात रिट याचिका दाखल केली.२२ जून २०२६ रोजी या याचिकेवर मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि मा. न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच, अंतरिम दिलासा देत विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेते पदाबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती दिली.
कोर्टाच्या या स्थगिती आदेशानंतर याचिकाकर्त्यांचे वकील अँड. ए. एम. घारे यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त, नागपूर यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. हायकोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे राजेश अड्डूर हेच चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कायम आहेत, त्यामुळे प्रशासनाने आता महाविकास आघाडी किंवा काँग्रेस गटाच्या वतीने राजेश अड्डूर यांच्याशिवाय इतर कोणत्याही नगरसेवकाचा किंवा व्यक्तीचा कोणताही पत्रव्यवहार अथवा संपर्क स्वीकारू नये. असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून वडेट्टीवार गटामध्ये आनंदाचे तर खासदार धानोरकर गटात मात्र सन्नाटा छा गया है.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List