नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!

भाजपा उमेदवार अमरनाथ राजूरकर यांची तिसऱ्यांदा विजय 

नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!

आधुनिक केसरी न्यूज

बालाजी वैजळे

नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर हे पराभुत झाले आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते पडली असून कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना केवळ ५ मते मिळाली आहेत. २३ मते बाद झाली आहेत. दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला आहे. 
नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाची द्वैवार्षिक निवडणूक १८ जून रोजी पार पडली होती. ४५२ मतांपैकी ४५१ मतदान झाले होते. मुदखेड नगरपालिकेतील एका महिला नगरसेविकेने मतदान केले नव्हते. २२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरवातीला सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या उघडून सर्व मते एकत्रित करण्यात आली. त्यानंतर २५ मतांचे गठ्ठे तयार करुन एकत्र करण्यात आली. तीन टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ११२ तर शिवसेना उबाठा गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना २२ मते मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना ३ मते मिळाली. १४ मते बाद झाली. दुसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११५ तर आष्टीकर यांना ३० मते मिळाली. इंगोले यांना २ मते मिळाली. तीन मते बाद झाली. तिसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११२ तर आष्टीकर यांना ३२ मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना शुन्य मते मिळाली. तर ६ मते बाद झाली. भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ४५१ मतांपैकी ३३९ मते मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यापेक्षा २५५ मते अधिक घेत दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ आणि वंचितचे उमेदवार इंगोले यांना ५ मते मिळाली. २३ मते ही बाद झाली आहेत.
विजयी उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे. 
नांदेड विधान परिषद निवडणूक मतमोजणी निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करत गुलाची उधळण करीत जल्लोष साजरा केला आहे.
नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी होताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमा होऊन  विजयाचा जल्लोष साजरा करत होते. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री डि पी सावंत, महापौर कविता मुळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख, संजय कौडगे, माधव कदम , नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, दिनकर दहीफळे, नगरसेवक किशोर स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, राजूरकर यांचे चिरंजीव अशितोष राजूरकर, माजी महापौर विजय येवनकर, कैलास गोरठेकर, गिरीश गोरठेकर, भाऊसाहेब गोरठेकर, प्रविण साले, प्रविण सारडा, नगरसेवक वैजनाथ देशमुख, महेन्द्र देमगुंडे, यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी
नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेल्या तीन वर्षांपासून निवडणूका झाल्या नव्हत्या मात्र नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी या निवडणुकीत ३३९ मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 

महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या मतांची संख्या ही १५० पेक्षा जास्त असतांना महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली आहेत. तसेच एम आय एम पक्षाची १५ मते होती ती मते कोणाच्या पारड्यात पडली यांचा अंदाज येत नाही. मात्र जी मते बाद झाली आहेत. त्यात एम आय एम पक्षाचे मते असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत महाविकास आघाडीच्या मतात मोठी फाटाफूट झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सुरवाती पासून एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


सर्वांचे आभार - खा. अशोकराव चव्हाण
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीची विजयी घोडदौड दिसून येते आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सुद्धा भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीच्या राज्यातील सर्वच विजयी उमेदवारांचे ही मी अभिनंदन करतो. महायुतीच्या या विजया मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  सुनेत्राताई पवार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच महायुतीचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. महायुतीच्या या विजयासाठी सर्वांचेच अभिनंदन व आभार माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..! नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!
आधुनिक केसरी न्यूज बालाजी वैजळे नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर...
श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान पालखी निघाली भक्तांसंगे 
खुलताबाद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळुन बाजार सावंगी मुख्य रस्त्यावरून धिंड
आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी
गोंदियात आंतरराज्यीय ‘पुष्पागँग’वर वन विभागाची चपराक वाहनासह तीन लाकूड तस्कर अटकेत; डोंगरगाव सहवनक्षेत्रातील धडक कारवाई
परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी