रा. स्व. संघाला १०० वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम: हर्षवर्धन सपकाळ
दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राम येथे यशस्वी सांगता.
On
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : सेवाग्राम, दि. २ ऑक्टोबर २०२५ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन असा सुवर्ण योग आला हा नियतीचा संकेत आहे, तो संकेत मानून संविधान व गांधी विचार स्विकारा व संघाचे विसर्जन करा हे आवाहन आम्ही केले होते. पण आज दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. संघाला १०० वर्षे झाली तरी मूंह में राम बगल में छुरी, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राम येथे यशस्वी सांगता झाली. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शहीद भगतसिंह यांचे भाच्चे प्रो. जगमोहन, माजी मंत्री सुनिल केदार, रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, अनिस अहमद, खासदार डॉ. कल्याण काळे, खा. गोवाल पाडवी, चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस संदेश सिंगलकर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, वर्धा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भान, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम समाजात भ्रम पसरवण्याचे आहे. देशाची फाळणी महात्मा गांधी यांच्यामुळे झाली व पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले, असा अपप्रचार संघ व संघ परिवार करत आला आहे. तसेच महान क्रांतीकारक भगतसिंह यांना फाशी झाली त्यावेळी गांधीजी गप्प बसले होते हा एक अपप्रचार केला जातो परंतु ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्याआधी त्यांना मारण्याचा सहावेळा प्रयत्न केला, त्यावेळी पाकिस्तान व ५५ कोटींचा प्रश्न कोठे होता? भगतसिंहाना फाशी होऊ नये म्हणून गांधींजींनी अनेक प्रयत्न केले होते हे भगतसिंह यांचे भाच्चे प्रो. जगमोहन यांनीच सांगितले आहे..
संघाला १०० वर्ष होत असताना परवाच संघाने नागपूरच्या व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन केले, ज्यांचा सर्वात जास्त वेळ महात्मा गांधी यांना बदनाम करण्यात गेला त्यांना गांधीजींनाच शरण जावे लागले हा संघाचा वैचारिक पराभव आहे, त्यांनी आता संविधान स्विकारावे व संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्यासाठी काम करावे. तसेच गांधी विचार स्विकारावा हे आमचे आवाहन होते पण आज युवक काँग्रेसचे पदाधिकारी संविधानाची प्रत घेऊन संघाचे मुख्यालय रेशीम बागेकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली. आज अटक करण्यात आली असली तरी पुन्हा एनएसयुआयच्या हाती संविधान देऊन पाठवू आणि नाही घेतले तर ३० जानेवारीला गांधी पुण्यतिथीदिनी महिला पदाधिकारी जातील आणि तेव्हाही घेतले नाही तर १४ एप्रिलला पुन्हा त्यांना संविधान देण्याचा प्रयत्न करू. आरएसएस विसर्जित करा ही मागणी घेऊन वर्षभर पदयात्रा काढू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवला.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, हा देश सर्वांचा आहे, शोषित, पीडित, मागास समाजाचा आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे संविधान आहे म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मागील ११ वर्षात देश अस्थिर केला आहे. केवळ जातीच्या व धर्माच्या नावाने द्वेष पसरवून आपली खूर्ची टिकवण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न सरकार ऐकत नाही. देशावर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. ज्यांनी संघावर बंदी घातली त्या सरदार पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा भाजपा सरकारने उभा केला आहे, त्यांच्याकडे एकही महापुरुष नाही. संविधानाला विरोध करणारे, तिरंगा न फडकवणारे संघ व भाजपावाले देशभक्ती शिकवत आहेत, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
आज संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते जी. जी. पारीख यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. पारीख यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील न्याय, समता यांसाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक अनमोल व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांचा आदर्श आणि कार्याची आठवण नेहमीच प्रेरणादायी राहील अशा भावना प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केल्या.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Oct 2025 16:54:56
आधुनिक केसरी न्यूज सुधीर गोखले कवलापूर : येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा प्रस्तावित विमानतळ प्रश्नी काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री...
Comment List