नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू : पालकमंत्री अतुल सावे
नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली.
तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून वैयक्तिकरित्या
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत :
संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.
मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता.
पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा : आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला. यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List