काँग्रेस च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे अनिल धानोरकर आज भाजपात प्रवेश घेणार..!
आधुनिक केसरी न्यूज
भद्रावती वरोरा : विधानसभा मतदारसंघांमध्ये धानोरकर यांच्या राजकीय वलयाला विधानसभेत भाजपाने सुरुंग लागला आणि आता धानोरकर परिवारातीलच सदस्याने अर्थात दिवंगत बाळू धानोरकर यांचे बंधू, भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी घरातच राजकीय सुरुंग लावल्याची बातमी समोर येत आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये धानोरकर परिवाराच्या वतीने बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर विधानसभेची उमेदवारी कुटुंबातील सदस्य म्हणून अनिल धानोरकर यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु बाळू धानोरकर यांच्या सौभाग्यवती प्रतिभा धानोरकर यांचे बंधुप्रेम उफाळून आल्याने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ बंधुप्रेमाखातर थेट काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी आपले भाऊ प्रवीण काकडे यांना देण्याचा अट्टाहास केला. या अट्टाहासमुळे बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर अतिशय नाराज झाले. आणि अखेर त्यांनी प्रवीण काकडे यांच्या विरोधात आघाडी उघडत विधानसभेमध्ये आपली उमेदवारी जाहीर केली.
या निवडणुकीमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांचा दारुण पराभव झाला. तर बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांचाही पराभव झाला. अनिल धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेचे तीनदा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. शिवसेनेचा किल्ला एक हाती लढवत असताना बाळू धानोरकर यांनी या परिसरामध्ये शिवसेनेचा चांगलाच दबदबा निर्माण केला होता. पुढे राजकीय पटलावर घडणाऱ्या अनेक घडामोडीमुळे धानोरकर हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले आणि या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्या. या विजयानंतर खासदार धानोरकर यांना लोकसभेनंतर लगेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मताचा प्रभाव कायम राहील अशी अपेक्षा होती. म्हणून त्यांनी भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी ही आपल्या भावालाच मिळावी हा अट्टाहास कायम ठेवला. यापुढे काँग्रेस पक्ष ही झूकला. काँग्रेस ने प्रवीण काकडे यांना उमेदवारी जाहीर केली. या घटनेमुळे दुखावलेले अनिल धानोरकर यांनी अखेर स्वतंत्ररीत्या लढण्याचा निर्णय घेतला त्यात त्यांना यश मिळाले नसले तरी आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली उमेदवारी आणि आपले राजकीय अस्तित्व कायम राहावे या दृष्टिकोनातून विचार करत असताना भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली थेट मुंबईमध्ये भाजपा पक्ष प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा पक्षप्रवेश आजच अगदी काही वेळातच मुंबईमध्ये होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळते आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे अनिल धानोरकर यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये येथील राजकारण एक वेगळ्या दिशेकडे वाटचाल करेल असे आता बोलल्या जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List