वाशिम जिल्ह्याच्या पिंपरी सरहद्द येथे पुरामुळे ट्रक उलटला; चालक ठार, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान
आधुनिक केसरी न्यूज
ज़ैनुल आबेद्दीन
बुलढाणा : वाशिम व बुलडाणा जिल्ह्यामध्ये कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील शेवटच्या हद्दीवर असलेले दोन गाव येथून जवळच असलेले पिंपरी सरहद्दजवळील उतावळी व काच नद्यांना पूर आला आहे. यामुळे 23 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुलावर पुराचे पाणी आले आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या दरम्यान, ट्रक क्रमांक एमएच-20-जीसी-5531 हा एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन प्रवास करत होता. स्थानिक ग्रामस्थांनी पुराचे पाणी ओसरेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती, परंतु चालकाने धोकादायक निर्णय घेत पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. पावसामुळे पुराची पातळी जास्त असल्याने घटनास्थळी मदत पोहोचवता आली नाही.
पाऊस ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी धाडस करून ट्रकजवळ पाहणी केली. केबिनमध्ये चालक मृतावस्थेत सापडला. घटनास्थळी दाखल झालेल्या शिरपूर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून वाशिम येथे पाठवला. आधारकार्डवरून मृताची ओळख शेख हुसेन शेख गुलाब (वय अंदाजे ३९, रा. हीना नगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी पटली. ही पूरस्थिती यावर्षी दुसऱ्यांदा आली आहे. यापूर्वी २५ जून रोजीदेखील या नद्यांनी रौद्र रूप धारण केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकतीच तीबार पेरणी पूर्ण केली होती, मात्र या पुरामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून, सरकारकडून नुकसानभरपाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List